कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 01:37 PM2024-06-23T13:37:38+5:302024-06-23T13:39:37+5:30

भाजपच्या उमेदवाराचे काम केले असल्याचा गंभीर आरोप पुण्यातील काँगेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला

in pune lok sabha election Some worked some betrayed I have information with names action will be taken Nana Patole | कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला; माझ्याकडे नावांसह माहिती, कारवाई होईलच - नाना पटोले

पुणे: कोणी काम केले, कोणी विश्वासघात केला याची नावांसह सगळी माहिती माझ्याकडे आहे. त्यांच्यावर कारवाई होईलच, अशी जाहीर तंबी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole) यांनी काँग्रेस भवनमध्ये गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीरपणे दिली. पक्षाचे शहरातील नेतेही यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघात (Pune Lok Sabha) झालेल्या पराभवाची झाडाझडती पटोले यांनी शनिवारी झालेल्या बैठकीत घेतली.

सर्व विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कार्यकर्ते बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रचारप्रमुख प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, बाळासाहेब शिवरकर तसेच ॲड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, आबा बागूल, अविनाश बागवे, अजित दरेकर, प्रशांत सुरसे व अन्य अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासमोरच पटोले यांनी सभागृहातील कार्यकर्त्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय बोलते केले. प्रत्येक बूथवरील मतदानाची आकडेवारी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगायला लावली.

या दरम्यान अनेकांनी नेत्यांवर आरोप केले. भाजपच्या उमेदवाराचे काम केले असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. आवश्यक ते साहित्य नेत्यांकडून मिळाले नाही, असेही सांगण्यात आले. नेते फिरकलेच नसल्याचीही तक्रार काही कार्यकर्त्यांनी केली. ठरलेली प्रचारफेरी अचानक रद्द करणे यासारखे प्रकारही घडले असल्याचे काहींनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट हा एकमेव मतदारसंघ वगळता अन्य सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पिछाडी कशी मिळाली? असा प्रश्न पटोले यांनी केला. प्रत्येक नेत्याला जबाबदाऱ्या नेमून दिल्या होत्या. काय काम करायचे, कोणते काम करून घ्यायचे ते सांगितले होते. कार्यकर्त्यांना राग येणे स्वाभाविक आहे, कारण त्यांनी कष्टपूर्वक काम केले. गडबड कुठे झाली, कशी झाली ते मला माहिती आहे, त्याची मी खात्री करून घेत आहे, असे पटोले यांनी बैठकीतच सांगितले.

कसबा, कॅन्टोन्मेंट या दोन्ही विधानसभा मतदारसंघांची त्यांनी विस्ताराने माहिती घेतली. कॅन्टोन्मेंट या मताधिक्य देणाऱ्या मतदारसंघातील काही गोष्टींबाबतही त्यांनी थेट माजी मंत्री रमेश बागवे यांच्याकडेच हरकत नोंदवली. कसब्यातील नेते म्हणवणारे त्यांच्या भागातच मताधिक्य मिळवून देत नसतील तर कसे? असा प्रश्न त्यांनी केला. पुणे मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिले होते, पण पराभव झाला. तो धक्कादायक आहे, त्याची दखल नक्की घेतली जाईल, असा विश्वास पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

पराभवाची कारणमिमांसा होत नसल्याच्या तक्रारी काही कार्यकर्त्यांनी प्रदेश शाखेकडे केल्या होत्या. त्यामुळेच पटोले यांनी त्याची दखल घेत ही बैठक घेतली. ते काँग्रेस भवनमध्ये असतानाच बाहेरच्या आवारात कार्यकर्त्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. एक कार्यकर्ता दुसऱ्या नेत्यावर टीका करणारे पोस्टर घेऊन आला होता. त्याला त्या नेत्याच्या समर्थकांनी मारले. पोलिसांनी लगेच हस्तक्षेप केल्यामुळे नंतर काही झाले नाही.

Web Title: in pune lok sabha election Some worked some betrayed I have information with names action will be taken Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.