वाघोली (पुणे) : वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलची फी भरली नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर डांबून ठेवल्याप्रकरणी पालकांनी व मनसे पदाधिकारी यांनी स्कूल विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर खंडणी व अपहरणाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बुधवारी (दि. १८) दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी सुट्टी झाल्यानंतर काही मुलांना शाळेतच ठेवून पालकांना फी भरण्यासंदर्भात सांगण्यात आले. फी भरा आणि मुलांना घेऊन जा असे शाळेकडून सांगण्यात आल्याचे काही पालकांनी सांगितले. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक धावत शाळेत आले आणि शाळेने केलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली. त्याचवेळी मनसे पदाधिकारी व पालक यांनी एकत्रित शाळेच्या प्राचार्यांना तीव्र शब्दांत जाब विचारला. पालकांचा रोष पाहता लोणीकंद पोलिसांनादेखील बोलाविण्यात आले. काही पालक मुलांना घेण्यासाठी वर्गावर गेले असता त्यांना मुलांना भेटू दिले जात नसल्याचा आरोपही उपस्थित पालकांनी केला. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर मुलांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी संतप्त पालक व मनसे पदाधिकारी यांनी शाळेच्या विरोधात लोणीकंद पोलिस ठाण्यात फी भरली नसल्याने मुलांना डांबून ठेवल्याची लेखी तक्रार दाखल करून खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
या प्रकाराबाबत स्कूलच्या प्राचार्यांना पालकांनी जाब विचारला असता पालकांचा गैरसमज झाला असल्याचे सांगून गोंधळात न बोलता प्रत्येक पालकाशी वैयक्तिकरीत्या भेटून बोलणार असल्याचे सांगितल्याचे पालकांचे म्हणणे आहे. झाल्या प्रकाराबाबत संबंधित शाळेच्या व्यवस्थापक विभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी संपर्क होऊ शकला नाही.
फी न भरल्याने मुलांना शाळेत डांबून ठेवले असल्याची तक्रार मनसेच्या कार्यकर्त्यांनी तक्रार लोणीकंद पोलिस ठाण्यात दिली आहे.
- गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे