लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशी गाईंचे संवर्धन जलद गतीने होण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या स्तरावर प्रथमच पुण्यात गाईंमध्येही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यातून होलस्टिन फ्रिजन गाईच्या पोटी अधिक दूध देणाऱ्या साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील देशी गाय संशोधन केंद्रात देशी गाईंच्या आयव्हीएफ अर्थात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबविण्यात आला. या केंद्रात शुक्रवारी एका होलस्टिन फ्रिजन गाईने सुदृढ देशी साहिवाल कालवडीला जन्म दिला. जन्मत: कालवडीचे वजन २७ किलो आहे. याच केंद्रात गेल्या महिन्यात होलस्टिन फ्रिजन गाईच्याच पोटी गीर जातीच्या कालवडीने जन्म घेतला.
साहिवाल, राठीवरच संशाेधनदेशात गाईंच्या ५० स्थानिक जाती आहेत. त्यापैकी साहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी व थारपारकर या पाच जातींचे दुधासाठी संगोपन केले जाते. साहिवाल ही जात दिवसातून दोन वेळेला किमान १४ ते १६ लीटर दूध देऊ शकते. राठी ही राजस्थानमधील जात मराठवाडा व विदर्भात चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते. त्यामुळे या केंद्रावर या दोन जातींबाबत संशोधन सुरू आहे.
असा आहे प्रयाेगnया तंत्रासाठी शेतकऱ्यांना २० ते २२ हजारांचा खर्च येतो. त्यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य मिळेल. nपहिल्यांदा विणाऱ्या गाईंमध्ये याचा वापर केल्यास यशस्वीतेचे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत आहे. जास्त वेत असलेल्या गाईंमध्ये हे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे.
गीर ही जात ठरावीक वातावरणातच चांगले दूध देते. साहिवाल ही जात कमी चारा खाऊन, कमी आजारी पडून चांगले दूध उत्पादन देते. त्यामुळेच या जातीच्या संवर्धनासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. यामुळे राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना देशी वंशावळ असलेल्या स्थानिक वातावरणात चांगले दूध उत्पादन देणाऱ्या गाई उपलब्ध होऊ शकतील.- डॉ. सोमनाथ माने, प्रमुख, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र
देशी गाईंची घटती संख्या पाहता हे तंत्रज्ञान आशेचा किरण आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी