पुणे : पुण्याच्या धायरी भागात रंग निर्मितीच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत कारखान्यात सिलेंडरचे आठ ते दहा वेळा स्फोट झाल्याने मोठी आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी कारखाना मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
धायरी, गणेश नगर, गल्ली क्रमांक 22 येथे एका कारखान्याला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून ०८ वाहने दाखल झाली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. संबंधित आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पुणे पोलीस दाखल झाले. पोलिसांकडून परिसरातील गर्दी दूर सारण्याचे काम करण्यात आले. कारखान्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरु करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.