पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुत्र्यांचे भांडण सुरू असताना हे भांडण न सोडल्याने दोन माणसांमध्ये भांडण झाले. यामध्ये एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कुत्र्याच्या बेल्टने मारहाण केली. 17 डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कॅन्टीन जवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. चतु:र्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 21 वर्षीय तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेवक चाळ या ठिकाणी शेजारी शेजारी राहतात. शनिवारी दुपारच्या सुमारास फिर्यादी यांचा कुत्रा आणि आरोपी यांचा कुत्रा या दोघात भांडण सुरू झाले. तेव्हा आरोपीने फिर्यादीला कुत्र्यातील भांडण सोडवण्यासाठी सांगितले. फिर्यादी मात्र मी मध्ये पडणार नाही असे बोलून पुढे निघून जात होता. त्याचवेळी आरोपीने पाठीमागून जाऊन हातातील कुत्र्याच्या बेल्टने फिर्यादीच्या डोक्यात मारले. चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.