पुणे : घराच्या मालकीच्या वादातून दुरुस्ती न केल्याने घराचे छत अंगावर पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. स्टेनली मॅक्सी डिसाेजा (५४) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत जेरी मॅक्सी डिसाेजा (६०,रा.कॅम्प,पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सैफुद्दीन मिठाईवाला (रा.काेंढवा), बिटू ऊर्फ महेश पडियार आणि चिंटू उर्फ नरेश पडियार (दोघेही रा. कॅम्प) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही घटना २६ जून २०२३ रोजी घडली.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी यांचे कॅम्प परिसरात दस्तुर मेहेर राेड याठिकाणी घर आहे. घराचे मुळ मालक सैफुद्दीन मिठाईवाला व त्यांच्याकडून सदरचे घर विकत घेणारे महेश पडियार व नरेश पडियार यांनी त्यांच्या साेबत असलेल्या अंतर्गत वादामुळे सदर मालमत्तेची वेळाेवेळी दुरुस्ती केली नाही. फिर्यादी जेरी डीसाेजा यांना देखील घर दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात आली नाही. घरमालकांनी सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील करून घेतले नाही. संबंधित इमारत ही राहण्यायाेग्य स्थितीत ठेवणे ही सर्वस्वी घरमालकाची जबाबदारी होती. तरीदेखील घरमालक हे सदर इमारतीच्या आवश्यक दुरुस्ती करण्यात अपयशी ठरले असून त्यांच्या या निष्काळजीपणामुळे व हयगयीमुळे फिर्यादी राहत असलेल्या घराचे छत पडून त्यात त्यांचा भाऊ स्टेनली मॅक्सी डिसाेजा हा मयत झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) पवार करत आहेत. स्टेनली मॅक्सी डिसाेजा हे मस्कत येथे एका कंपनीत काम करत होते. सुटीनिमित्त भावाला भेटण्यासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी हि घटना घडून त्यांचा मृत्यू झाला.