पुणे : जगातील अनेक शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक पशुपतीनाथ मंदिर असून या मंदिराची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात आहे. भारतातील अनेक लोकांना नेपाळ येथे जाऊन दर्शन घेण्याचा योग जुळून येत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा अपूर्णच राहते. याच गोष्टी लक्षात घेत यंदाच्या वर्षी शनिपार मंडळ ट्रस्ट पशुपतीनाथ मंदिरातील गर्भगृहाचा देखावा साकारत आहेत.
मंडळाचे उपाध्यक्ष योगेश फाळके यांनी सांगितले की, मंडळाचे हे १३१ वे वर्ष आहे. यंदाचा देखावा वेगळ्या पद्धतीचा आहे. देखाव्यासाठी गेल्या ३ तीन महिन्यांपासून काम सुरू आहे. मूळ मंदिराबरहुकूम देखाव्याचा संपूर्ण आराखडा मिथिलेश कुमार यांनी तयार केला आहे. मंदिराचा देखावा साधारणतः ६० फूट गुणिले ४० असणार आहे, तसेच समोरील भागात मोठे भव्य महाद्वार आहे. त्याची उंची ३५ फूट एवढी असणारे आहे. हुबेहूब पशुपतीनाथ मंदिराचा गर्भगृह साकारणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यासाठी २५ ते ३० लोकांचा समूह काम करत आहे.
शिवभक्तांमध्ये पशुपतीनाथ मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगभरातील २७५ शिवलिंगांपैकी एक पशुपतीनाथ आहे. पशुपतीनाथ मंदिर उत्तरेकडील सर्वांत पवित्र आणि महत्त्वाचे आहे. येथील शिवलिंग पंचमुखी असून या पाचही मुखांचे वेगळे महत्त्व आहे. सद्योजता, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ईशान अशी या पंचमुखांची नावे आहेत.
देखाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये
-- भव्य महाद्वार, ज्याची उंची ३५ फूट उंच आहे.
- मंदिराच्या गर्भगृहातील संपूर्ण रेखीव काम.
- पशुपतीनाथ भगवंताची मूर्ती आणि त्यात मंडळाचे बाप्पा विराजमान होणार आहेत.