पुणे : हॉटेल बंद करण्याची वेळ झाल्याने कव्वालीच्या कार्यक्रमाचे म्युझिक बंद केले. या रागातून टोळक्याने हॉटेलमधील सामानाची तोडफोड करून ग्राहकांना मारहाण केली. हा प्रकार मुंढवा-कोरेगाव पार्करोडवरील वॉटर्स बार अँड किचन या हॉटेलमध्ये दि. ५ ऑगस्टला मध्यरात्री दीड वाजता घडला.
याबाबत निखिल मेदनकर (वय ३२, रा. वाघोली) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमित चौधरी, संकेत सावंत, प्रफुल्ल गोरे, अजय मोरे, फिरोज शेख, आण्णा भंडारी, निखिल वंजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करतात. हॉटेलमध्ये कव्वालीच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मध्यरात्री दीड वाजल्याने हॉटेल बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे हॉटेलचे मालक अमोल शिनलकर यांनी कार्यक्रम बंद करून हॉटेलमधील म्युझिक बंद केले. त्याचा सुमित चौधरी याला राग आला. त्याने कार्यक्रम चालू ठेवा, असे जोरजोरात ओरडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. इतर आरोपींना बोलावून घेतले. त्यांनी हॉटेलमधील सामानाची तोडफोड केले. हॉटेलचे मालक व त्यांचे मावस भावाला शिवीगाळ करून धमकी दिली. हॉटेलचे बाउन्सर व हॉटेलमधील इतर गिऱ्हाईकांना हाताने मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक महानोर तपास करीत आहेत.