पुणे : काही आजार असाे किंवा नसाे आमचा कैदी पेशंट किंवा सर्वसामान्य पेशंट ॲडमिट करून घ्या, अशा प्रकारे रुग्णांचे दबाव राजकीय व्यक्तींकडून ससूनमधील डाॅक्टरांना येत आहेत. दुसरीकडे त्यांना ॲडमिट करून घेतल्यावर पुन्हा आम्हालाच टीकेचे धनी व्हावे लागते. एकप्रकारे ताेंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागताे, अशी हतबलता ससून रुग्णालयातील उपचार करणारे प्रामाणिक आणि निप:क्षपणे काम करणारे डाॅक्टर व्यक्त करत आहेत.
ससून रुग्णालयात महिनाेनंमहिने कैदयांनी मुक्काम ठाेकला त्यावरून सध्या ससून रुग्णालय टीकेचे धनी ठरत आहे. परंतू, हे कैदी असाे किंवा एखादा रुग्ण असाे त्याला ॲडमिट करून घ्या, त्याला आयसीयु दया अशा प्रकारे ससूनमधील डाॅक्टरांवर दबाव राजकीय व्यक्तींकडून आणला जाताे. काही वेळेला पेशंटला ॲडमिट करण्याची गरज नसते. किंवा आयसीयु मध्ये जागाही नसते. तरीही त्यांना आयसीयु चा बेड दया असा तगादा लावला जात असल्याचे डाॅक्टर खासगीत सांगतात.
त्यासाठी ज्या कैदी रुग्णांसाठी ज्या राजकीय व्यक्तींचा फाेन येताे त्यांचे नाव त्या रुग्णाच्या कागदपत्रांवर नमुद करून ताे कागद न्यायालयात देखील सादर करण्याची परवानगी आम्हाला दयावी. तसेच त्याबाबतचे एक रजिस्टर करण्यात यावे व त्यामध्ये असे फाेन आलेल्यांचे नावे लिहीण्याची परवानगी दयावी, अशीही मागणी यावेळी काही डाॅक्टरांनी केली आहे.
मंत्री दादा भुसे, तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्या
ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांच्या तावडीतून एखादा कुख्यात आरोपी सहज पळून जाणे, ही बाब पुणेपोलिसांसाठी लाजिरवाणी आहे. या गंभीर आणि संशयास्पद प्रकरणात आरोपी ललित पाटील याच्यावर उपचार करणाऱ्या ससून रुग्णालयातील सहा डॉक्टरांची, पोलिसांची, ससून अधिष्ठाता आणि संबंधित स्टाफची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी व्हावी. तसेच संशयाच्या भोवऱ्यात आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आणि अकार्यक्षम आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.