पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत केल्यानंतर शहरासह जिल्ह्यात गेल्या १० दिवसांत तब्बल एक लाख लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याअंतर्गत शनिवारी राबविलेल्या विशेष शिबिरात तब्बल १६ हजारांहून अधिक जणांनी बूस्टर डोस घेतल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग तुलनेने कमी असल्याने अनेकांनी बूस्टर डोसकडे पाठ फिरवली होती. त्यातच हा डोस घेण्यासाठी ३७५ रुपये मोजावे लागत होते. त्यामुळेही हा डोस घेण्याबाबत अनेकांनी असमर्थता दर्शवली. त्याचा परिणाम लसीकरणावर झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. १५ जुलैपासून पुढील ७५ दिवस विशेष लसीकरणाची मोहीम राबविण्याची घोषणा केली. त्यानुसार बूस्टर डोस मोफत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे लसीकरणाला पुणे जिल्ह्यात वेग आला आहे.
वास्तविक पहिला आणि दुसरा डोस मोफतच होता. मात्र संसर्ग कमी झाल्याने डोस घेणाऱ्यांची संख्या रोडावली होती. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात १० हजार २४३ जणांनी पहिला, तर २३ हजार २२८ जणांनी दुसरा डोस घेतला. त्यात पुणे शहरात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ५ हजार ८० असून, दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३ हजार २७८ इतकी आहे. पिंपरी शहरात ११७३ जणांनी पहिला डोस, तर १७७१ जणांनी दुसरा डोस घेतला. जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ३९९० जण असून, दुसरा डोस घेणारे १८ हजार १७० जण झाले आहेत.
सर्वाधिक प्रतिसाद पुण्यात
गेल्या दहा दिवसांमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल १ लाख ६ हजार १७७ बूस्टर डोस देण्यात आला. पुणे शहरात सर्वाधिक ५३ हजार ४७८, पिंपरी शहरात १६ हजार ३७४, तर जिल्ह्यात ३६ हजार ३२५ जणांनी या उपक्रमाचा फायदा घेतला. यासह पहिल्या व दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद वाढला आहे.
विशेष शिबिरे यशस्वी
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शनिवारी व बुधवारी लसीकरणासाठी विशेष शिबिरे राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा परिणाम या शनिवारी (ता. २३) दिसून आला. यादिवशी जिल्ह्यात पहिला डोस घेणारे ५९२, दुसरा डोस घेणारे २१००, तर बूस्टर डोस घेणारे ६ हजार ९७ जण आहेत. येत्या बुधवारीही जिल्ह्यात या विशेष शिबिराला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.