बारामती दि २६ (प्रतिनिधी )तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जीएसटी लागू करण्याबाबत बैठक आयोजित केली होती.त्या बैठकीच्या वेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.मोदी यांनी त्या बैठकीत जीएसटी वर सर्वाधिक हल्ला चढवला होता.मात्र आज त्यांची भूमिका वेगळी झाली आहे ,जीएसटी मधून अधिक उत्पन्न मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .त्याचा सर्व व्यवसायांवर परिणाम झाल्याची टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला.
बारामती येथे बारामती मर्चंट असोसिएशन च्या मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते .यावेळी पवार यांनी पंतप्रधानांसह केंद्र सरकारच्या कर रचनेवर टीकास्त्र सोडले.पवार म्हणाले ,करातून उत्पन्न मिळते ही बाब मान्य आहे, पण कर लादताना ते किती प्रमाणात लादावेत याचाही काहीतरी विचार होण्याची गरज आहे. सोन्याच्या खरेदीवर 38 टक्क्यांपर्यंत वाहनखरेदीवर ४० टक्क्यांपर्यंत कर लावला जातो. महाराष्ट्र ऑटोमोबॉईल हब आहे, या माध्यमातून रोजगारनिर्मिती तर होतेच पण त्या बरोबर अनेक लघुद्योगही चालतात, या मुळे हा कर या सर्वांवर परिणाम करणारा ठरत आहे .व्यापार वाढवायचा असेल तर राज्य व केंद्राचे धोरण पूरक हवे, प्रोत्साहनात्मक हवे, चांगले वातावरण तयार करण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.जर्मनी व अमेरिकेत काही कंपन्या संकटामुळे बंद पडलेल्या आहेत, ही संधी समजून आपण काहीतरी पावले उचलायला हवीत, भारतीय वंशाचे उद्योगपती इंग्लंडच्या पंतप्रधानपदापर्यंत मजल मारु शकत असेल तर आपण भारतीय काहीही करु शकतो, या जिद्दीने काम करणे आवश्यक आहे.
पुणे परिसरात नामांकीत चार पाच उद्योगपतींनी उद्योग सुरु केल्याने चार लाख लोकांना रोजगाराची संधी मिळाली, हिंजवडीमधील सॉफ्टवेअरमधून दोन लाख कोटींचा व्यापार होतो.हे लक्षात घेणे आवश्यक आहे. साखर कारखान्यांनी साखरेसोबत इथेनॉल व वीजनिर्मिती सुरु केल्याने अनेक कारखान्यांनी आता जिल्हा बँकाकडून कर्जे घेणे थांबविले आहे .ते स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत .ब्राझील व थायलंडमधील संकटाचा भारतीय साखर उदयोगाला चांगला फायदा मिळणार असल्याचे पवार म्हणाले. मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्ताविकात जीएसटीमुळे भुर्दंड वाढला, गूळाची आवक मंदावली, वारंवार कररचनेतील बदलांचा व्यापारावर परिणाम झाल्याची चिंता व्यक्त केली.