पुणे : व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्यासाठी १६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्या प्रकरणात पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगीनवार यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी त्यांनी एका विद्यार्थ्याच्या पालकांकडे १६ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० लाख रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख ५० हजार रुपये शुल्क आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त १६ लाख रुपये देण्याची मागणी डॉ. बंगीनवार यांनी केली होती. लाचेची मागणी करणाऱ्या या अधिष्ठाताला एसीबीने मंगळवारी (दि.८) अटक केली.
आरोपीची पोलिस कोठडीची मुदत दि.१२ ऑगस्टला संपल्यामुळे त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी अर्जाला विरोध केला. आरोपीने स्वीकारलेली रक्कम मोठी आहे, तसेच ही शासकीय संस्था असून, महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तेव्हापासून आरोपी डॉ. बंगीनवार हे तेथे अधिष्ठाता आहेत. सध्या कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे आरोपीने आणखी विद्यार्थ्यांकडून प्रवेश मिळवून देण्यासाठी पैसे घेतले असण्याची दाट शक्यता आहे.
याबाबत तपास केल्यास मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचाराची साखळी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. याबाबत साक्षी-पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे, तसेच तपास अजून बाकी असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. घोरपडे यांनी केला. न्यायालयाने तो मान्य करीत आरोपीचा जामीन फेटाळला.