चाकण (पुणे) : चाकूने गळा चिरून व दगडाने ठेचून महिलेची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह झुडपात फेकून देऊन फरारी होण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रियकरास अवघ्या चोवीस तासात महाळुंगे इंगळे गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी मंगळवारी ( दि. २२ नोव्हेंबर ) बेड्या ठोकल्या आहेत.
निकिता संभाजी कांबळे ( वय - २८, सध्या रा. खराबवाडी, ता. खेड, मूळ रा. कवठा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तिच्या हत्येप्रकरणी तिचा प्रियकर राम कुंडलिक सूर्यवंशी ( वय - ३९, रा. पवार वस्ती, साईबाबा मंदिर, दापोडी, पुणे,) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक वृत्त असे की, निकिता कांबळे व राम यांचे यापूर्वी एकत्रित एलेप्रो मॉल चिंचवड येथे काम करीत असताना सूत जुळले. त्यानंतर काही दिवसांनी निकिता हिचे आणखी कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याबाबत राम याला संशय आला. तसेच राम याचे लग्न झाल्यामुळे त्याच्या घरातील लोकांना सदर प्रेमसंबंधाबाबत माहिती झाली होती. त्यामुळे राम याची पत्नी त्याच्याबरोबर बोलत नव्हती. तसेच निकिता ही सुद्धा राम याच्याबरोबर बोलत नव्हती. ती त्याला टाळू लागली होती. त्यामुळे रागाच्या भरात राम याने रविवारी ( दि. २० ) दगडाने ठेचून व धारदार हत्याराने गळा चिरून निकिता हिची हत्या केली होती.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी राम याने निकिता हिचा मृतदेह खराबवाडी (ता. खेड ) हद्दीतील इसम नामे विनायक रेवजी खराबी यांच्या मालकीच्या जमीन गट नं. ३८६ मध्ये दक्षिण दिशेला असणाऱ्या ओढ्यालगतच्या बांधावरील झुडपामध्ये फेकून दिला. त्यानंतर राम हा रातोरात गायब झाला. महाळुंगे इंगळे युनिट तीनच्या पथकातील हृषिकेश भोसुरे आणि राजकुमार हनमंते यांना गोपनीयद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे राम याचा शोध घेत पुणे येथील सिम्बोयसिस परिसरातून त्यास ताब्यात घेऊन तातडीने जेरबंद केले. दरम्यान, निकिता ही खराबवाडी येथे तिचा भाऊ व तिच्या दोन लहान मुलांसह राहत होती. तिच्या पतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी निधन झाले आहे. ती येथे एका खाजगी कंपनीत काम करत होती. महाळुंगे इंगळे पोलीस पुढील तपास करत आहे.