पुणे : शहरात जानेवारीपासून आतापर्यंत डायरिया (अतिसार) चे १३ हजार २६६ रुग्ण आढळून आले. याचे रुग्ण मे, जून, जुलैमध्ये वाढल्याचे दिसून आले. इतर महिन्यांत ते कमी झाले हाेते. दिवसातून तीन किंवा तीनपेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शैाचाला होणे, म्हणजे अतिसार हाेय. हा जलजन्य म्हणजे दूषित पाण्यातून पसरणारा आजार आहे. विविध प्रकारच्या विषाणू, जिवाणू तसेच इतर परजिवींमुळे हा आजार होतो. यामध्ये जुलाब हाेतात.
जानेवारी महिन्यात या आजाराचे ९७८ रुग्ण आढळले. फेब्रुवारीत त्याची संख्या कमी हाेऊन ७३० वर गेली. त्यानंतर मार्च महिन्यात ९५९, एप्रिल महिन्यात १ हजार ४२ रुग्ण आढळले. मे महिन्यात ही संख्या १ हजार ३२३ वर गेली. जूनमध्ये सर्वाधिक २३३० रुग्ण आढळले. जुलै महिन्यात १४२८ व त्यापुढे ही संख्या कमी हाेत गेली. नाेव्हेंबरमध्ये ही संख्या ९२२ वर आली.
कांजण्यांचे ७१ रुग्ण
कांजण्यांचे शहरात वर्षभरात ७१ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, यामध्ये जून महिन्यात सर्वाधिक २४ रुग्ण आढळले. त्याखालाेखाल ऑगस्ट महिन्यात ११ रुग्ण आढळले. फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी चार व सहा रुग्ण आढळले आहेत. कांजण्यांची साथ आता कमी झाली आहे.
हे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
अतिसाराच्या नियंत्रणासाठी शुध्द पाणी पुरवठा किंवा शुध्द पाणी पिणे, वैयक्तिक स्वच्छता, मानवी विष्ठेची योग्य विल्हेवाट, रुग्णांवर त्वरित उपचार आणि बालकाचे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण आदी बाबी आवश्यक आहेत.