पुणे : थंडीच्या हंगामात पुणेकरांना पावसाळ्यातील 'फिल' सोमवारी सकाळी अनुभवता आला. सकाळी ढगांनी आकाश भरून गेले आणि पावसाने जमीन ओली केली. आज (दि.९) व उद्या (१०) राज्यासह पुण्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती पहायला मिळत आहे. त्यामुळे उत्तरेकडून थंड वारे येत असून पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासूनच आकाशात मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झाली होती. परिणामी मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली. ढगांच्या दाटीने सूर्यनारायणाचे दर्शन देखील पुणेकरांना झाले नाही. रस्ते ओले झाल्याने अनेक ठिकाणी दुचाकी घसरून पडत होत्या. त्यानंतर सकाळी काही भागात रस्त्यावर माती टाकण्याचे काम अदर पूनावाला फांऊडेशनच्या कर्मचाऱ्यांनी केले.
आज आणि उद्या देखील पुणे परिसरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अतिहलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील ७२ तासांत सकाळी हलके धुके पडू शकते. आणि कमाल व किमान तापमानात घट होऊन दिवसाही गारठा जाणवू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. आज ९ जानेवारीला प. महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १० जानेवारीनंतर राज्यातील हवामान कोरडे राहील, असाही अंदाज हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिला आहे.