राजू इनामदार
पुणे : अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज दिल्लीतून निवड जाहीर होईल. काँग्रेसच्या १३७ वर्षांच्या इतिहासात पुण्यात आतापर्यंत फक्त एकदाच अध्यक्षपद आले. १९०५ मध्ये पुणे हीच कर्मभूमी असलेले भारत सेवक समाजाचे संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, मात्र ते अधिवेशन बनारसला झाले. त्यानंतर १८९५ ला वार्षिक अधिवेशन पुण्यात झाले; मात्र त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते.
पुण्यातील प्रयत्नांमधूनच काँग्रेसची स्थापना
पुण्यातील तत्कालीन नामवंतांच्या चर्चेतून इंग्रज अधिकारी सर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने काँग्रेसची स्थापना झाली. सार्वजनिक काका म्हणून ओळख मिळवलेल्या गणेश वासुदेव जोशी यांनी १८७० मध्येच पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना करून सनदशीर मार्गाने इंग्रज सरकारला सामाजिक, शैक्षणिक सुधारणा करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली होती. याच कामाला पुढे काँग्रेसच्या स्थापनेतून संघटनात्मक स्वरूप मिळाले व देशातील थोर व्यक्ती एकत्र येत १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
चर्चा पुण्यात; अधिवेशन मात्र मुंबईला
विशेष म्हणजे १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. त्याचवर्षी पहिले अधिवेशन पुण्यात घ्यायचा निर्णय झाला होता. मात्र नेमकी त्याचवेळी पुण्यात त्या काळात नेहमीच येत असलेली प्लेगची साथ आली आणि हे अधिवेशन मुंबईत झाले. त्यानंतर आतापर्यंतच्या इतिहासात फक्त एकदाच म्हणजे १८९५ मध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पुण्यात आले, मात्र त्याचे अध्यक्ष पुण्याबाहेरचे होते.
लोकमान्य टिळकही नव्हते कधीच अध्यक्ष
काँग्रेसवरच नव्हे, तर देशातही बरीच वर्षे राजकीय वर्चस्व टिकवून असलेले लोकमान्य टिळकही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकले नाहीत. टिळक काळाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले यांनी सांगितले की, लोकमान्य टिळकांचे काँग्रेसवर वर्चस्व होतेच, पण ते कायम ठेवण्याच्या प्रयत्नात १९०७ मध्ये सुरतच्या वार्षिक अधिवेशनात गोंधळ झाला. तरीही १९१६ मध्ये लोकमान्यांच्याच पुढाकाराने लखनौ अधिवेशनात प्रसिद्ध असा हिंदू-मुस्लीम लखनौ करार झाला.
राष्ट्रीय स्तरावर कमी होत गेले पुण्याचे महत्त्व
गोखले यांचे १९१५ मध्ये निधन झाले. त्यानंतर लोकमान्यही होमरूलसारख्या चळवळीत गुंतले. त्यांच्या निधनानंतर महात्मा गांधीजी काँग्रेसचे सर्वेसर्वा झाले. त्यांना महाराष्ट्रातूनही जनाधार मिळाला, मात्र न. चिं. केळकर त्याचे नेतृत्व करत टिळक गट वेगळा झाला. तोपर्यंत महात्मा गांधीजींचे नेतृत्व देशात प्रस्थापित झाले होते. पुण्याचे महत्त्व तेव्हापासून कमी कमी होत गेले. १९३२ नंतर काँग्रेसचे वार्षिक अधिवेशनही बंद होत गेले व ते सोयीनुसार होऊ लागले.
काेण हाेते गोपाळ कृष्ण गोखले? (जन्म ९ मे १८६६, मृत्यू- १९ फेब्रुवारी १९१५)
महात्मा गांधी यांचे राजकीय गुरू, भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक, काँग्रेसमधील मवाळ गटाचे अग्रणी, पुणे हीच त्यांनी कर्मभूमी बनवली, ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर विश्वास, सनदशीर मार्गानेच स्वराज्य मिळू शकते, याबद्दल आग्रही, प्रचंड विद्वान, अर्थशास्त्राचे अभ्यासक, अर्थशास्त्रावरची त्यांची भाषणे, मते ऐकण्यासाठी इंग्लंडच्या तत्कालीन संसदेचे सदस्य उत्सुक असत. अनेक इंग्रज आयोगांसमोर साक्षी देत भारताची स्थिती त्यांच्यासमोर आकेडवारीनिशी सिद्ध करून दाखवली.