पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणात आणखी एक महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहायक फौजदाराला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे.
पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, सहायक फौजदार रमेश जनार्दन काळे अशी बडतर्फ केलेल्यांची नावे आहेत. ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यासह नऊ जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत पोलिस शिपाई नाथा काळे आणि अमित जाधव यांचा ललित पाटील याच्या पळून जाण्यात सहभाग असल्याचे दिसून आल्यावर अगोदर अटक केली. त्यानंतर या दोघांना बडतर्फ केले आहे.
उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व सहायक फौजदार जनार्दन काळे यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी होती. ललित पाटील पळून गेला तेव्हा ते उपस्थित नव्हते. या सर्व प्रकरणात पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.