लोकसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल; अजित पवारांचे स्पष्टीकरण
By अजित घस्ते | Published: March 10, 2024 05:52 PM2024-03-10T17:52:51+5:302024-03-10T17:53:01+5:30
आम्ही किती जागा मागितल्या हे आताच जाहीर करणार नाही. परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत
पुणे : महाविकास आघाडीने बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. आम्हीही लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर करणार आहोत. आम्ही किती जागा मागितल्या हे आताच जाहीर करणार नाही. परंतु, व्यवस्थित जागा मागितल्या आहेत. तिन्ही पक्षांचा सन्मान राहील असे जागावाटप होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे लोहगाव विमानतळावरील नवीन टर्मिनलच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
या दरम्यान आमदार सुनील शेळके यांना मुद्दामहून लक्ष्य करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. आमदार सुनील शेळके यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यांनी कोणालाही दम दिला नव्हता. शेळके यांच्या उमेदवारीबाबत आधीच त्यांचे नाव पक्ष कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. महायुतीच्या ४८ जागांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही आमचे उमेदवार जाहीर करू. उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह मी दिल्लीला जाणार आहे. तिथे जागावाटपावर चर्चा होईल. जागावाटप उद्या अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा उमेदवारांच्या बाबत चित्र लवकरच स्पष्ट झालेले दिसेल.