पुणे : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मात दिल्यानंतरही महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या जिल्हा शाखांमध्ये विश्वासाच्या वातावरणाऐवजी संशयाचे धुके फिरताना दिसत आहे. आघाडीत वरवर शांतता दिसत असली, तरी आतून मात्र जोरदार खदखद सुरू असल्याचे जाणवते आहे. राष्ट्रवादीचे बिनीचे नेते असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबतीत सातत्याने ते पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर अनेक आमदार जाणार अशा बातम्या पसरत आहेत, हेच याचे कारण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेप्रणीत शिवसेनेचे जिल्ह्यातील नेतेही शांत दिसत आहेत. त्यांना, ‘पवार आलेच तर आपले काय?’ अशी धाकधूक असल्याचे दिसते आहे.
सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या कायदेशीर पात्रतेबाबतच्या निकालात १६ आमदार अपात्र ठरले, तर सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. या १६ आमदारांच्या यादीत पहिला क्रमांक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच आहे. निकाल विरोधात लागला तर लगेचच अजित पवारांना बरोबर घेऊन पुन्हा सरकार बनवण्याचे राजकारण भाजप करणार असल्याचे खात्रीने सांगितले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्याप्रमाणे निम्म्यापेक्षा जास्त आमदार बरोबर घेऊन थेट शिवसेनेवर दावा केला, तसेच अजित पवारही करतील, अशी चर्चा आहे.याचा इन्कार खुद्द अजित पवार यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजप-शिवसेना युती भक्कम असून, आगामी निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील, असे सांगितले आहे. तरीही शरद पवार, अजित पवार काहीही करतील असेच अनेकांना वाटते. या वातावरणामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. अशा पद्धतीचे राजकारण होणारच नाही, असे कोणालाच वाटत नाही. जाहीरपणे बोलताना मात्र सगळेच महाविकास आघाडी भक्कम असे म्हणत आहेत.
भाजपला अजित पवारांची भीती
पवार कुटुंब एक होते, एक आहे व एकच राहील. राज्यभरात माहिती असलेले, नेतृत्व गुण विकसित झालेले अजित पवार हेच राज्यातील सध्याचे एक क्रमाकांचे नेते असल्याने भाजपला तेच मोठा अडथळा वाटतात व त्यांची ट्रोल गँग अशा अफवा पसरतात.- प्रशांत जगताप, माजी महापौर, शहराध्यक्ष
कसब्याचा भाजपला धसका
महाविकास आघाडीचा भाजपने धसका घेतला आहे. ती एकत्र राहू नये म्हणून त्यांची ही चाल आहे. आघाडी भक्कम आहे व कसब्याप्रमाणेच पुढचेही निकाल लागतील. -अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
भाजपला शिंदे गटाचे ओझे
अजित पवार शरद पवार यांना परत एकदा सोडून जातील असे वाटत नाही. त्यांनीही याचा इन्कार केला आहे. भाजपचा डाउनफॉल सुरू झाला आहे. बरोबर घेतलेल्या शिंदे गटाचे त्यांना ओझे झाले आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविल्या जात आहेत. -संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना
आम्ही एकत्रच, भांडणे त्यांच्यात
आम्हाला त्यांची भीती बाळगण्याचे काही कारण नाही. आमच्या सरकारला कसलाही धोका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे पुढील निवडणूक मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असे जाहीरपणे सांगितले. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाचा दुसऱ्यावर विश्वास नाही. त्यांच्यात भांडणेच आहेत. काँग्रेस अदानींवर टीका करते, तर शरद पवार अदानींची भेट घेतात. उद्धव ठाकरे भाषणाला आले तर अजित पवार त्यांच्याकडे ध्वनिक्षेपक देत डोळा मारतात. त्यामुळे ते एकत्र राहूच शकत नाहीत हे सत्य आहे. -नाना भानगिरे- शहरप्रमुख, शिवसेना, किरण साळी- युवा सेना, राज्य सचिव