पुणे : बऱ्याचदा हात न धुतल्यामुळेच पोटाचे विकार उद्भवतात. जंत होणे, डायरीया, त्वचा आणि डोळ्यांच्या आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे नागरिकांना वेळोवेळी हात धुण्याची सवय लागावी, हात धुण्याचे फायदे- तोटे समजावे, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी यासाठी शनिवारी (दि. १५) जिल्ह्यात ‘जागतिक हात धुवा दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
यात सार्वजनिक ठिकाणी, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये हात धुण्याचे शास्त्रीय प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जिल्हा कक्षातून जागतिक हात धुवा दिन आणि हात धुण्याचे महत्त्वाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हात धुण्याच्या सोप्या पद्धती, त्याचे फायदे, हात न धुतल्यास होणारे आजार, हात केव्हा धुवावेत यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. याचे प्रात्यक्षिक ग्रामपंचायत, सर्व अंगणवाडी, सर्व शाळेत दाखविण्यात येतील. तालुकास्तरावर सर्व कार्यालयात हात धुवाचे प्रात्यक्षिक घेण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाकडून सांगण्यात आले.