पुणे : चंदुकाका सराफ या सराफी पेढीचे संचालक किशोरकुमार शहा यांच्या नावाने बँकेत फोन करुन आरटीजीएसद्वारे १९ लाख रुपये ट्रान्सफर करण्यास लावून सायबर चोरट्यांनी स्टेट बँकेला १९ लाखांना गंडा घातला. याप्रकरणी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक आशिष जवखेडकर (वय ४६, रा. बसंतबहार सोसायटी, बाणेर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बंडगार्डन येथील मुख्य शाखेत चंदुकाका सराफ अँड सन्स या नावाने कंपनीचे चालू खाते आहे. फिर्यादी हे २० डिसेबर रोजी बँकेत असताना त्यांना त्यांना एका क्रमांकावरुन फोन आला. आपण चंदुकाका सराफमधून संचालक किशोरकुमार शहा बोलत असल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडे फिक्स डिपॉझिटमध्ये २ कोटी रुपये ठेवण्याबद्दल व्याज दराची चौकशी केली. त्यानंतर म्युचअल फंडामध्ये गुंतवणुक करावयाची असल्याचे सांगून सांयकाळी ६ वाजेपर्यंत त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यास सांगून आपण शहा बोलत असल्याचे त्यांच्या मनावर ठसवले. त्यानंतर त्यांचे जवळचे नातेवाईक यांचे मेडिकल इमर्जन्सी आहे. त्यामुळे त्यांना ९ लाख ५० हजार आणि ७ लाख ५५ हजार रुपये असे २ आरटीजीएस तात्काळ करावयाचे असल्याचे सांगून मेलवर त्या बँक खात्याची माहिती पाठविल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी बँकेला आलेला मेल तपासला. त्यात एच डी एफसीचे दोन बँक खाते दिले होते. कंपनीचे चेक बुक संपल्यामुळे त्यांना आरटीजीएस द्वारे तात्काळ व्यवहार करायचे आहे, असे नमूद केले होते. त्याचवेळी किशोरकुमार शहा यांचा वारंवार फोन येत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी घाईगडबडीत दोन्ही खात्यांवर प्रत्येकी ९ लाख ५० हजार रुपयेअसे १९ लाख रुपये ईमेलमध्ये सांगितलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम पाठविली. ती त्या बँक खात्यावर ट्रान्सफर झाली. तसे त्यांनी शहा यांना फोन करुन सांगितले. तेव्हा त्यांनी त्याचे व्हाऊचर तयार ठेवा, मी बँकेमध्ये येऊन सही करतो, असे सांगितले.
त्यानंतर काही वेळाने चंदुकाका सराफ यांच्या कंपनीतून तेथील कर्मचारी यांनी फोन करुन हा आमच्या कंपनीचा ई मेल नसून अशा प्रकारे कोणताही व्यवहार करण्याची परवानगी त्यांच्याकडून देण्यात आली नसल्याचे बँकेच्या सहायक व्यवस्थापक अपर्णा शेडे यांना सांगितले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे आर टी जी एस विभाग व एच डी एफ सी बँकेचे आर टी जी एस विभागास ई मेल करुन हा व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यानंतर एस डी एफ सी बँकेतून यातील काही पैसे आय सी आय सी आय बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाल्याचे सांगण्यात आले. त्याने त्या बँकेला हे व्यवहार थांबविण्यास कळविण्यात आले. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानकर अधिक तपास करीत आहेत.