पुणे :पुणे शहर पोलीस दलात वर्षभर केलेल्या कामगिरीच्या आधारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बक्षीसे दिले जातात. उपयुक्त आणि त्यावरील दर्जाच्या अधिकारी हे बक्षीस मंजूर करत असतात. बक्षीस देताना वेगवेगळी निकष लावले जातात. त्या-त्या कर्मचाऱ्यांनी केलेली कामगिरी पाहून ही बक्षिसे दिली जातात. मात्र पुणे पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बक्षीस देण्याच्या नावाखाली आपल्या चालक, ऑपरेटर आणि गार्ड वरच लाखोंची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. यामुळे पुणे पोलीस दलात असंतोष निर्माण झाला आहे.
खरंतर अनेक पोलीस वेगवेगळ्या राज्यात जाऊन गुन्ह्याचा तपास करत असतात. जीवावर उदारहून आरोपींना पकडत असतात. सराईत गुन्हेगार, ज्यांना शहरातून तडीपार करण्यात आला आहे अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी गेल्यानंतर तो पोलिसांवर हल्ला करू शकतो, हा हल्ला पोलिसांच्या जीवावर बेतू शकतो मात्र असं असतानाही स्वतःच्या जीवावर उदार होऊन काही पोलीस कर्मचारी अशा गुंडांना पकडत असतात. अशा कर्मचाऱ्यांना बक्षीस मिळणं गरजेचं आहे.
परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी तर कहर केला आहे. त्यांनी सर्वाधिक बक्षिसे मंजूर केली आहे. ही बक्षीस कुणाला दिली तर त्यांना दर आठवड्याला पोलीस आयुक्तालयात होणाऱ्या मीटिंगसाठी वेळेवर पोहोचवल्याबद्दल ठराविक चार कर्मचाऱ्यांवरच खैरात केली आहे. त्याच चार कर्मचाऱ्यांना वेळेत पोहोचविल्याबद्दल तब्बल 21 वेळा तर उत्तम बंदोबस्त केल्याबद्दल पाच वेळा असे 26 वेळा बक्षीस दिले आहेत. परिमंडळ तीनच्या अखत्यारित पाच पोलीस ठाणे आहेत. विशेष म्हणजे या पाचही पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्यांच्या या बक्षीसाला पात्र ठरला नाही. मात्र उपायुक्त मॅडमला ऑफिसला वेळेवर घेऊन जाणाऱ्या चालकावर बक्षिसाच्या नावाखाली उधळपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान बक्षिसांची यादी जाहीर झाल्यानंतर शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्येच असंतोष पसरला आहे. काही कर्मचाऱ्यांनी तर नाव न सांगण्याच्या अटीवर काम करणारे बाजूला राहिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची खुशामती करणाऱ्यांनाच बक्षीस देण्यात आल्याचे सांगताना नाराजी व्यक्त केली.