पुणे : मराठी आणि उर्दू माध्यमाच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना तसेच मराठी माध्यमाच्या आदर्श शाळांतील दुसरीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक आणि द्विभाषिक, सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तके देण्यात आली आहेत. दरम्यान, राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमांच्या सर्व प्राथमिक शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना २०२६-२७ पर्यंत टप्प्याटप्प्याने या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे.
गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ विद्यार्थ्यांना इंग्रजीतून कळावे, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन सोपे हाेण्यास मदत हाेईल. या संकल्पनेतून शालेय शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तके द्विभाषिक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२०-२१ मध्ये राज्यातील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या प्रयाेगाची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच मराठी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना २०२२-२३ पासून एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (विद्या प्राधिकरण) यांची आहे. संबंधित विषयाच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून अभ्यासक्रम तयार केले जात आहेत. तर पाठ्यपुस्तके यांची छपाई करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) आहे. समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सर्व पात्र शाळांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येतील. तसेच समग्र शिक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके बालभारतीकडून खुल्या बाजारात उपलब्ध करून दिली जातील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
राज्यात अशी देणार पाठ्यपुस्तके
सन माध्यम किंवा शाळा प्रकार इयत्ता
२०२३-२४ - मराठी आणि ऊर्दू माध्यम पहिली आणि दुसरी
आदर्श शाळा तिसरी
२०२४-२५ - मराठी आणि ऊर्दू माध्यम पहिली, दुसरी व तिसरी
आदर्श शाळा चाैथी
२०२५-२६ - मराठी आणि उर्दू माध्यम पहिली, दुसरी, तिसरी व चाैथी
आदर्श शाळा पाचवी
२०२६-२७ - मराठी आणि उर्दू माध्यम पहिली ते पाचवी