पुणे : बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत धरणांच्या पाणीपातळीतही समाधानकारक वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुणे शहरात ६ तर लोणावळा येथे ९८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुरुवारीही घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात खेड तालुक्यातील कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे.
जिल्ह्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस लोणावळा येथे २१६ मिमी झाला. त्या खालोखाल लवासा येथे १३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. निमगिरी येथे ६०, गिरीवन येथे ५३.५ मिमी पाऊस झाला तर बुधवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत लोणावळा येथे ९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. लवासा येथेही ३९ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आले. घाट परिसर तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातही चांगला पाऊस होत असल्याने कळमोडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. वडिवळे धरणाच्या परिसरातही १११ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून हे धरण ५७ टक्के भरले आहे. या पावसामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टक्क्यांत)
माणिकडोह १५.३६, येडगाव ३७.८१, डिंभे १७.७०, चिल्हेवाडी ५८.९९, चासकमान ३०.४०, भामा आसखेड ३८.२९, वडिवळे ५७.४९, आंद्रा ४९.१६, पवना ४०.४४, कासारसाई ३२.२५, मुळशी २९.८२
एका दिवसात सव्वा टीएमसी पाणीसाठा
खडकवासला धरण साखळीत सायंकाळी संपलेल्या २४ तासांत तब्बल १.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे महापालिकेने शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुढील आठवड्यापर्यंत ढकलला आहे.
खडकवासला प्रकल्पांतील धरणांतील पाणीसाठा
टेमघर ०.९२ टीएमसी २४.८० टक्के पाऊस २५ मिमी
वरसगाव ५.०३ टीएमसी ३९.२५ टक्के पाऊस १४ मिमी
पानशेत ४.३३ टीएमसी ४०.७० टक्के पाऊस १६ मिमी
खडकवासला ०.९५ टीएमसी ४८.३१ टक्के पाऊस ६ मिमी
एकूण ११.२४ टीएमसी ३८.५५ टक्के
पुणे शहरातही गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे तसेच अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. शहरात झालेला पाऊस (मिमी) : शिवाजीनगर ५.८, पाषाण ६.७, लोहगाव २.८, चिंचवड ४, हडपसर २.५, वडगाव शेरी ३.५, कात्रज ५.२, वारजे ८.८.
पाच दिवस घाट परिसरात जोरदार पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात गुरुवारपासून पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून घाट परिसरात मुसळधार ते तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.