पुणे : शहरातील बार, परमीट रूम, रेस्टॉरंट आदींना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी दिलेली असताना ग्रामीण भागातील मात्र, रात्री साडेबारा वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. बार, परमीट रूम, रेस्टॉरंट आदींमध्ये सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटना वारंवार घडत असून काही मालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे आदेश काढण्यात आल्याचे कदम यांनी स्पष्ट केेले आहे.
शहरातील पब, हॉटेल रात्री दीडपर्यंत खुले ठेवण्याबाबतचा आदेश पोलिस आयुक्तांनी नुकताच काढला आहे. शहरातील पब हे ग्रामीण भागातील पबपेक्षा लवकर बंद होत असल्याने ग्राहकांनी आपला मोर्चा शहरालगतच्या गावांमध्ये असलेल्या हुक्का पार्लर आणि बारकडे वळविला आहे. त्यामुळे अनेक हुक्का पार्लर, बार, परमीट रूम हे पहाटेपर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि परिसरात शांतता राखण्यासाठी ग्रामीण भागातील हॉटेल, परमीट रूम, हुक्का पार्लर यांच्या नियमनासाठी आदेश काढण्याची विनंती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केला. आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कदम यांनी दिला आहे.
या परिसरात आता १४४ कलम लावण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात जमाव जमवता येणार नसून अशांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच हुक्का पार्लरमधून हर्बल हुक्क्याच्या नावाखाली निकोटीनयुक्त हुक्का ग्राहकांना दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या प्रचलित नियमानुसार वयाचे निकष या आस्थापनांमध्ये पाळले जातील. २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला दारू दिली जाणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशात ग्रामीण भागातील सर्व बार, परमीट रूम रात्री साडेबारा वाजता पूर्णपणे बंद करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हॉटेलमध्ये येण्या-जाण्याचा मार्ग, ग्राहक बसण्याची जागा, बार काऊंटर आदी ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत असेही त्यात सांगण्यात आले आहे. ग्राहक बसण्याच्या जागी कुठल्याही प्रकारचे नृत्य करण्याची परवानगी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.