पुणे: झुकलेले विद्युत खांब, त्यावर लोंबकळलेल्या विजेच्या तारा, वायरींचे जाळे वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे चित्र शहरातील दाट लोकसंख्या असलेल्या झोपटपट्टी, वस्तीमध्ये पाहायाला मिळत आहे. तर त्याचबरोबर बहुतांश विद्युत वाहिन्या या रहिवाशांच्या घरांवरून गेलेल्या आहेत. यामुळे शहरातील दाट वस्तीमध्ये ,झोपडपट्टी मध्ये धोकादायक वायरींचे जाळे पसरले आहे.
यापुर्वी दहा ते बारा वर्षांपूर्वी मार्केटयार्ड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथे मोठी दुर्घटना घडून दहा ते बारा जणांनी जीव गमावला हाेता. गुलटकेडी औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक ठिकाणी खुल्या विद्युत वाहिन्या आहेत. यामुळे सध्या कडक उन्हाळ्यात भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी शहरातील दाट वस्तीमध्ये धोकादायक वायरींचे जाळे काढण्याची मागणी नागरिकांच्याकडून वारंवार केली जात आहे. यापूर्वीही शहरातील झोपटपट्टीमध्ये मोठया दुर्घटना घटल्या आहेत. वायरिगं वाहिन्यांना चिकटल्याने अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना पुणे शहरात घडलेल्या आहेत. धोकादायक वायरिंगमुळे 'शॉर्टसर्किट' होऊन आग लागण्याच्या घटनाही शहरात उन्हाळ्यात घडलेल्या आहेत.
औद्योगिक वसाहत, मार्केटयार्ड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपटपट्टी, प्रेमनगर, धनकवडी. जनता वसाहत, पर्वती दर्शन, पद्मावती, हडपसर, रामवाडी, शिवाजीनगर, राजीव गांधी वसाहत आदी दाट झोपटडपट्टी भागात विद्युत खांबांवर खुल्या विद्युत वाहिन्या आहेत. गुलटेकडी येथील औद्योगिक वसाहतीमधील नागरिकांच्या घरांवर लटकणाऱ्या उघड्या विद्युत वाहिन्यांचे जाळे दूर करण्याची मागणी भाजप झोपडपट्टी आघाडीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.