Shirur Vidhan Sabha 2024: शिरूर-हवेली मतदारसंघांत दुपारनंतर गती वाढली; अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:11 PM2024-11-20T17:11:21+5:302024-11-20T17:12:40+5:30
शिरूर हवेली मतदार संघात सकाळी ७ पासून ३ पर्यंत ४३.६० टक्के एवढे मतदान झाले
शिरूर : शिरूर तालुक्यात सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसून आला. सुरुवातीला मतदानाची गती संथ होती; परंतु दुपारनंतर ही गती वाढली. शुकशुकाट असलेल्या अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी सकाळी सात वाजता त्यांच्या वडगाव रासाई गावात कुटुंबीयांसह मतदान केले. तर महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांनी त्यांच्या वाघोली या गावी मतदानाच्या हक्क बजावला. सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली होती. सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने काही गैरप्रकार घडले नाहीत. मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाइल फोन घेऊन जाण्यास मनाई होती. पोलीस या सूचनेचे काटेकोर पालन करीत मोबाइल फोन शंभर मीटरच्या आत आणू देत नव्हते. त्यामुळे पोलिस व मतदार यांच्यात वाद होत होते. प्रत्येक ठिकाणी वृद्ध व अपंग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था करण्यात आली होती; तसेच मतदार कक्ष व पाळणाघराची व्यवस्था केल्याने मतदारांची चांगली सोय करण्यात आली होती; परंतु सकाळी थंडीचे प्रमाण अधिक असल्याने मतदानाला नागरिकांचा उत्साह कमी होता. त्यामुळे सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत ४.२७ टक्के एवढेच मतदान झाले होते. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत १४.४४ टक्के एवढेच मतदान झाले. तर सात ते एक २८.६६ टक्के मतदान झाले; तसेच सात ते एक ४३.६० टक्के एवढे मतदान झाले.
दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना नागरिकांचे मतदान करून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. दुपारनंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदार पैशांच्या आशेने घरातून बाहेर पडत नव्हते. यामुळे अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. सायंकाळनंतर मात्र प्रत्येक मतदान केंद्रावर लांब रांगा लागल्याचे चित्र होते.