पुणे : आंतरराष्ट्रीय संस्था असल्याच्या नावाखाली फॅशन डिझायनिंगचे शिक्षण देणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन (आयएनआयएफडी) या संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या सुमारे साडेतीनशे विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर हा प्रकार समोर आला. विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी नसताना बनावट प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले.
डेक्कन पोलीस ठाण्यात ७० ते ८० विद्यार्थ्यांनी येऊन तक्रार दिली. महाराष्ट्रात परराज्यातील विद्यापीठाच्या पदवीचे शिक्षण देता येत नाही. मात्र, तरीही आयएनआयएफडी या संस्थेने अण्णामलाई विद्यापीठाचे अभ्यासक्रम पुण्यात सुरू केले. फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर डिझायनिंग आदी अभ्यासक्रमास अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला.
युवी सेनेने विद्यार्थी व पालकांसमवेत डेक्कन पोलीस ठाण्यात संस्थेच्या विरोधात तक्रार दिली. याबाबत योग्य तपास करून संस्थेवर कारवाई करून विद्यार्थ्यांना त्यांचे शुल्क परत द्यावे, अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली. नियमबाह्य पद्धतीने अभ्यासक्रम शिकवले जात असून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचे सहसचिव किरण साळी यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या नियमापेक्षा दहापट शुल्क आकारणी
विद्यापीठाचे शुल्क सुमारे ३५ हजार असताना या संस्थेने अडीच ते साडेतीन लाख रुपये शुल्क आकारले. मात्र, संस्थेकडून चालवला जात असलेला अभ्यासक्रम बेकायदेशीर व नियमबाह्य असल्याचे काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना समजले. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी याबाबत संस्थेकडे विचारणा सुरू केली. त्यावर संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून याबाबत माहिती देण्यास सुरुवात केली.
आयएनआयएफडी या संस्थेला शासनाची मान्यता आहे की नाही? याची चौकशी केली जाणार आहे. मान्यता नसल्यास पैसे परत द्यावे, अशी मागणी ७० ते ८० विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यानुसार पुढील तपास करून कारवाई केली जाणार आहे.
- मुरलीधर कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे