पुणे : यंदाच्या गणेशोत्सवामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला श्री पंचकेदार मंदिराच्या प्रतिकृतीची आरास करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट रोजी ११ वाजून ३७ मिनिटांनी गणेशाची प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर सायंकाळी सात वाजता विद्युत रोषणाईचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ही आरास भाविकांना पाहण्यासाठी खुली होईल, अशी माहिती ट्रस्टचे उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने श्री पंचकेदार मंदिराचा देखावा तयार करण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून प्रत्यक्षात सुरू करण्यात आले असून, ८० टक्के पूर्ण झाले आहे. येत्या चार दिवसांत काम पूर्ण होईल. बुधवारी (३१ ऑगस्ट) सकाळी साडेआठच्या सुमारास मंदिरापासून गरुडरथातून श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सुभाष सरपाले यांच्याकडून हा रथ फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी साडेअकराच्या सुमारास गुजरातमधील गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.
या पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस माणिकराव चव्हाण, उपाध्यक्ष बाळासाहेब परांजपे, विश्वस्त अक्षय गोडसे, अमोल केदारे आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
यंदा अध्यक्षविना उत्सव
दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले. मात्र, गोडसे हयात असताना त्यांच्या संकल्पनेतून यंदाच्या श्री पंचकेदार मंदिराचा देखावा साकारण्याचे काम सुरू झाले होते. त्यांच्या निधनानंतरही हीच आरास करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यामळे गोडसे हेच अध्यक्ष आहेत असे मानून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच अध्यक्षाविना गणेशोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती उत्सव प्रमुख हेमंत रासने यांनी दिली.
३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण
गुरुवारी (१ सप्टेंबर) रोजी पहाटे सहा वाजता ऋषीपंचमीनिमित्त ३१ हजार महिला सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत वारकरी सांप्रदायाकडून हरिजागर होणार आहे. त्याशिवाय सूर्यनमस्कार, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत.