पुणे : वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे. पण हा मतदारसंघ महायुतीत भाजपही मागत आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला असला तरी वडगावशेरी मतदारसंघावरील दावा भाजपने सोडलेला नाही. भाजपने या मतदारसंघात निवडणुक लढवावी यासाठी कार्यकर्ताचा आग्रह आहे असे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.
मुळीक म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर केला आहे. तरीही वडगाव शेरी मतदार संघाचा विषय संपला असं काही नाहीये. अर्ज भरण्यासाठी अजूनही ३, ४ दिवस बाकी आहेत. त्यामुळे पुढच्या काळात काय घडतंय हे बघणं गरजेचं आहे. वडगाव शेरीच्या पदाधिकाऱ्यांची ही भूमिका आहे कि, भाजपचा उमेदवार असला पाहिजे. ही भूमिका आज, उद्या पण कायम राहील. या भूमिकेला आमचे नेते पक्षश्रेष्ठी न्याय देतील असा आमचा विश्वास आहे.
वडगाव शेरी मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. परंतु महायुतीत शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी हा मतदार संघ भाजपकडे द्यावा म्हणत उमेदवारी मागितली आहे. काल राष्ट्रवादीची यादी जाहीर झाल्यावर अजित पवार गटाकडून सुनील टिंगरेंना उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर महायुतीत रस्सीखेच सुरु झाल्याचे दिसत आहे. जगदीश मुळीक यांनी सुनील टिंगरेंना पाठिंबा न देत उमेदवारीवर भाजपसाठी दावा ठोकला आहे. भाजपने या मतदारसंघात निवडणुक लढवावी यासाठी कार्यकर्ताचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळिक काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातुन सुनिल टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून माजी नगरसेवक बापू पठारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जगदीश मुळीक यांना दिला होता शब्द
जगदीश मुळीक लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. तेव्हा पक्षाने त्यांना विधानसभेसाठी शब्द दिला होता. त्यानंतर त्यांनी मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार कारणासी सुरुवात केली होती. पण आता विधानसभेला अजित पवार गटाला संधी देण्यात आली. त्यावरून मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.