पुणे : पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते अाज गुरुवार दुपारी 3.30 वाजता झाले. याच सुमारास पुण्यात जाेरदार पाऊस सुरु झाला. उद्घाटनानंतर सभागृहात मुख्य कार्यक्रम चालू असताना इमारतीच्या छतावरुन काही ठिकाणी पाणी ठिबकू लागल्याने इमारतीच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात अाहे.
पुणे महापालिकेचा विस्तार वाढल्याने अधिकाऱ्यांना बसण्यासाठी तसेच पालिकेच्या विविध विभागांसाठी जुनी इमारत अपुरी पडू लागली. त्यातच पालिकेत नव्याने तेरा गावांचा समावेश झाल्याने दरराेज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली हाेती. त्यातच या नव्या तेरा गावांच्या समावेशामुळे नगरसेवकांची संख्याही वाढणार अाहे त्यामुळे जुने सभागृह अपुरे पडणार हाेते. बुधवार पर्यंत या नव्या इमारतीची विविध छाेटीमाेठी कामे चालू हाेती. सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नव्या इमारतीची पाहणी केली. त्यावेळी नव्या इमारतीचे काम चांगले झाले अाहे परंतु काही कामं अद्याप अपुरी राहिल्याने उद्घाटनाची घाई सत्ताधारी पक्षाने केली असल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली हाेती.
दरम्यान दुपारी उद्घाटन झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम सुरु असतानाच सभागृहाच्या छतावरुन काही ठिकाणी पाणी ठिबकू लागले. सभागृहाच्या मागील भागात नगरसेवक बसतात तेथे हे पाणी पडत हाेते. मुख्य कार्यक्रम चालू असल्याने महापाैरांना अाणि अधिकाऱ्यांना सगळ्या प्रकाराकडे पाहत बसावे लागले. पाणी गळत हाेते त्याठिकाणी प्लॅस्टिकची छाेटी बकेट ठेवण्यात अाली. या सर्व प्रकारामुळे इमारतीच्या उद्घाटनास खरंच घाई झाली का अशी कुजबूज सभागृहात चालली हाेती.