अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे आयोजित शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयांच्या विस्तारित इमारतीचा शुभारंभ व एकत्रित सभागृह इमारतीचा भूमिपूजन समारंभप्रसंगी श्री. पवार बोलत होते. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना उपनेते संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, आमदार अतुल बेनके उपस्थित होते.
पवार म्हणाले, जेव्हा आपले सरकार नसताना देखील तालुक्याचा विकास कसा करावा हे वळसे पाटलांकडून शिकावे. तालुक्यात त्यांनी शेतीबरोबरच शिक्षण क्षेत्रात मोठे काम केल्यामुळे शेतकऱ्यांची मुले मागे राहणार नाहीत. कुकडी, मीना असे प्रकल्प राबवून या भागात बंधाऱ्याचे जाळे निर्माण केले. त्यामुळे शेती सुपीक झाली. द्राक्ष, ऊस यांचे क्षेत्र वाढले. आज तालुक्यात १६ लाख लिटर दूध गोळा होत आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र पुरोगामी राज्य का आहे हे आंबेगावमध्ये आल्यावर पाहायला मिळाले. शहरात मोठ्या प्रमाणावर नाट्यगृहे आहेत. आता ग्रामीण भागात नाट्यगृह होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. अवसरी अभियांत्रिकी कॉलेज पाहिले असता वळसे-पाटील यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन उभारले आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले, रत्नागिरी येथे होत असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात अवसरीसारखे सभागृह बांधणार आहे. वळसे-पाटील यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री असताना केलेल्या कामामुळे आज उच्चतंत्र शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात काम होत असून, त्यामुळे महाराष्ट्रातील उच्च तंत्र शिक्षण विभाग देशात एक नंबर आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, शहराप्रमाणे ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला जोपासण्यासाठी तसेच विद्यार्थी व नागरिकांना नाटकांची आवड तसेच नाटके पाहण्याची संधी आता तालुक्यात उपलब्ध होणार आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, आता ग्रामीण भागातील नागरिकांना नाटक पाहण्यासाठी रसिकांना पुण्यासारख्या शहरात न जाता तालुक्यात सुविधा उपलब्ध होणार आहे. हे कलाकार व रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे यांनी केले.
फोटोखाली : अवसरी खुर्द येथे भूमिपूजन व उद्घाटन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार.