पुणे : महापालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून सुरू केलेले देशातील पहिले माहिती अधिकार ग्रंथालय मरणासन्न अवस्थेत शेवटच्या घटका मोजत आहे. नागरिकांना सहजपणे माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाची पुरती वाट लावण्यात आलेली आहे. सध्या या गं्रथालयामध्ये ठेवलेल्या जुनाट पुस्तकांवर मोठी धूळ साचली असून त्याकडे कुणीही फिरकेनासे झाले आहे.पुणे महापालिकेच्या वतीने १० आॅगस्ट २०१० रोजी मुख्य इमारतीमधील तिस-या मजल्यावर माहिती अधिकार ग्रंथालय सुरू केले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या माहिती अधिकार ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. सुरुवातीला काही दिवस चांगल्या पद्धतीने गं्रथालय चालविण्यात आले. मदतीसाठी ग्रंथालयामध्ये सहायक, सुरक्षारक्षक ठेवण्यात आले होते. मात्र, महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक, पर्यावरण अहवाल आदी महत्त्वाचा दस्तऐवजही या ग्रंथालयात उपलब्ध नाही. त्याचबरोबर शासनाचे परिपत्रक, माहिती अधिकार कायद्यात झालेले बदल याबाबत पुस्तके ग्रंथालयात ठेवण्यात आलेली नाहीत. अत्यंत जुनाट पुस्तके या ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर याची कोणतीही साफसफाई होत नसल्याने मोठी धूळ या पुस्तकांवर साचली आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून माहिती अधिकार ग्रंथालय चालविले जाते. मात्र, मनुष्यबळ नसल्याने ग्रंथालयाकडे लक्ष देता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पुणे महापालिकेने माहिती अधिकार ग्रंथालयासह दर सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नागरिकांना कागदपत्रे पडताळणीसाठी ठेवणे हा उपक्रमही सुरू केला होता. माहिती अधिकार ग्रंथालयाची दुरवस्था दूर करावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
देशातील पहिले माहिती ग्रंथालय मरणासन्न अवस्थेत ,केजरीवालांच्या हस्ते ग्रंथालयाचे झाले होते उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 2:43 AM