पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शहरात उद्या कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच पंतप्रधान जाणाऱ्या रस्त्यांची डाकडूचीही करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून रस्त्यांची पाहणी केली जात आहे. उद्या मेट्रोचे लोकार्पण आणि नव्या मार्गाचे भूमिपूजन पतंप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तसेच टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
पंतप्रधान मोदी सायंकाळी ५.३० वाजता पुणे विमानतळावर दाखल होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता विमानतळावरून स्वारगेटला मेट्रोच्या लोकार्पणासाठी जाणार आहेत. त्याठिकाणी मोदींच्या हस्ते स्वारगेट ते शिवाजीनगर या मेट्रोचा लोकार्पण सोहळा होईल. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता टिळक रस्त्यावरील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता मोदी पुणे विमानतळाकडे रवाना होणार आहेत.
पार्किंगसाठी या जागा ताब्यात
शहरातील नदीपात्र भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल- टिळक रोड, डी. पी. रोड- म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल- रमणबाग, हरजीवन हॉस्पिटल- सावरकर चौक, पीएमपी मैदान- पूरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग- मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
खासगी अवकाश उड्डाणांना मनाई
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश बुधवारी (दि. २५) मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते गुरुवारी (दि. २६) रात्री १२ वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात पॅराग्लायडिंग, हॉट बलून सफारी, ड्रोन, मायक्रोलाइट एअरोप्लेन आदी प्रकारच्या अवकाश उड्डाणांना लागू असतील. या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम २२३ नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.