भोर : रस्त्यावर लावलेल्या दुचाकी, चारचाकी व मालवाहतुकीच्या गाड्या, दुकानांच्या रस्त्यावर लावलेल्या पाट्या, भाजीपाला, फळविक्रेत्यांचे हातगाडे आणि रस्त्यावरच थाटलेली दुकाने तसेच रस्त्याची सुरू असलेली कामे यामुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. पोलीस आणि नगरपलिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे.भोर शहरातील चौपाटी, नगरपलिका चौक ते एसटी स्टँड आणि भोर पोलीस ठाणे सम्राट चौक ते राजवाडा चौक व सुभाष चौक ते राजवाडा यादरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, नगरपलिका आणि शासकीय कार्यालये, बँका यांमुळे विविध कामांसाठी येणाºया नागरिकांमुळे वाहतूक अधिक प्रमाणात असते.बँकांना व शासकीय कार्यालयांना आणि दुकानांना वाहने लावण्याच्या सुविधा नाहीत. त्यातच रस्त्यात लावलेल्या गाड्या, दुकानांच्या पाट्या, भाजीपाला- फळविक्रेते यांच्या हातगाड्या तसेच रस्याच्या दुतर्फा बसून विक्री करतात. मागील वर्षभरापासून शहरात सुरू असलेली काँक्रीट रस्त्यांची कामे यामुळे वाहतुकीची वारंवार कोंडी होते.शहरात विविध कामांनिमित्त येणारे नागरिक शाळा, कॉलेजचे विद्यार्थी यांना या कोंडीतून वाट काढत जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागते. यातून एखादी दुचाकी किंवा चारचाकी गाडी पायावरून जाण्याच्या घटना घडतात.गाडी मागेपुढे घेण्यावरून वादावादी होते. मंगळवारी आठवडेबाजार असतो. या दिवशी तर बाहेरून भाजीपाला विकायला आलेले व्यापारी, शेतकरी नगरपलिकेपासून चौपाटीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मालविक्रीसाठी बसतात. तर, चौपाटी शिवाजी पुतळा येथील महाड-भोर रोडवरही बाजार भरत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते....तर प्रश्न सुटेलभोर पोलीस व भोर नगरपालिका प्रशासनाने एकत्र येऊन अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करून रोडवर दोन्ही बाजूंनापी-वन, पी-टू अशा प्रकारचे फलक लावून वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत केली, तरच काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे. अन्यथा, नागरिकांना धुराचा वास घेत धोका पत्करून थांबलेल्या वाहतुकीतून मार्ग काढावा लागेल.
भोरमध्ये वाहतुकीचा बोजवारा, नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 2:45 AM