चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा-बटाट्याची आवक घटल्याने भाव तेजीत राहिले. जळगाव भुईमूग शेगांची प्रचंड आवक होऊनही भाव स्थिर राहिले. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांची किरकोळ आवक झाली, तर पालेभाज्यांच्या बाजारात शेपूच्या भाजीची आवक वाढूनही भाव कडाडले. जनावरांच्या बाजारात जर्सी गाईच्या संख्येत वाढ झाल्याने भाव कोसळले. बैल, म्हैस व शेळ्यांच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल दोन कोटी ५७ लाख ८१ हजार रुपये झाली. चाकण मार्केट यार्डमध्ये कांद्याची एकूण आवक ३१० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक १४० क्विंटलने घटल्याने भावात २०० रुपयांनी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव १८०० रुपयांवरुन २ हजार रुपयांवर पोहोचला. तळेगाव बटाट्यांची एकूण आवक ७४२ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक ७३ क्विंटलने घटल्याने भावात २०० रुपयांनी वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव २५०० रुपयांवरुन २७०० रुपयांवर पोहोचला. जळगाव भुईमूग शेगांची एकूण आवक ४५ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २५ क्विंटलने वाढल्याने भाव ५५०० रुपयांवर स्थिरावले. बंदुक भुईमूग शेंगांची एकूण आवक ३३ क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २ क्विंटलने घटूनही कमाल भाव ६ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३६० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक पंधरा क्विंटलने घटूनही मिरचीचे भाव गडगडले.
आवक घटली; कांदा, बटाटा तेजीत
By admin | Published: November 24, 2014 1:00 AM