लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागात देखील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने गावातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. गावातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी केल्यास, गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना व जनजागृती केल्यास गावातील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्ह्यात कोविड रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच सध्या ऑक्सिजन बेड्ससह रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडू लागला आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गावात आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गाव पातळीवरील घरोघरी जाऊन तापसणी करणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, कोविड रुग्ण सापडला तर तातडीने कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करणे, कोविड रुग्णांची नोंद ठेवणे आदी उपाययोजना करतात. सदर कामामध्ये साथरोग व मृत्यूदर शून्य होणे तसेच जनजागृती व कोविड-१९ साथरोग प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी व यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना आखली आहे.
...तर प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता
गावात कोणत्याही संक्रमक रोगाचा उद्रेक, फैलाव किंवा पुनर्उदभव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी २३ एप्रिल ते ७ मे या पंधरा दिवसांत गावात ॲक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांनी कमी झाल्यास व कोरोनामुळे एकही मृत्यू न झाल्यास प्रत्येक कर्मचाऱ्यास २ हजार रुपये भत्ता, पंधरा दिवसांत गावात कोरोना रुग्णांची संख्या ६० ते ८० टक्क्यांनी कमी केल्यास व एकही कोविड रुग्णांचा मृत्यू न झाल्यास प्रत्येकी १५०० रुपये आणि गावात कोविड रुग्णांची संख्या ४० ते ६० टक्क्यांनी कमी केल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देणार आहे. गावात जीव धोक्यात घालून जनजागृतीचे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांचा कामास दाद देणे आणि गावातील कोविडचा प्रादुर्भाव कमी करणे दोन्ही उद्देश असल्याचे पानसरे यांनी स्पष्ट केले.