राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : द्राक्ष निर्यात करणाऱ्या कंपन्यांना परदेशातून मिळणाऱ्या रकमेवर दिली जाणारी प्रोत्साहनपर रक्कम केंद्र सरकारने बंद केली आहे. त्याचा थेट परिणाम द्राक्षांच्या किमतीवर होत असल्याने निर्यातदार शेतकरी हैराण झाले आहेत.
मागील वर्षांपर्यंत कंपन्यांना ही रक्कम मिळत होती. द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन म्हणून परदेशातून मिळत असलेल्या त्यांच्या चलनातील एकूण रकमेवर ७ टक्के या दराने भारतीय चलनात ही रक्कम निर्यातदार कंपनीला केंद्र सरकार देत असे. त्यामुळे अनेक निर्यातदार कंपन्या या क्षेत्रात पुढे आल्या. त्याचा द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे लाभ होत होता.
मागील ५ वर्षांत ही रक्कम ५ टक्के करण्यात आली. केंद्र सरकार यासाठी स्वतंत्र तरतूद करत होते, त्याऐवजी कृषी खात्याच्या वेगवेगळ्या योजनांमधून ही रक्कम देण्यात येऊ लागली. जानेवारी २०२१ पासून तर ती बंदच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३५ हजार शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यात केली होती. दरवर्षी साधारण २ लाख द्राक्षे निर्यात होतात. सध्या २०० पेक्षा जास्त कंपन्या द्राक्ष निर्यातीत काम करतात. या निर्यातदार कंपन्यांनी द्राक्ष खरेदी दरात कपात केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे. देशात यंदा ४२ हजार २५० द्राक्ष बागांची नोंदणी झाली आहे. त्यातील ४१ हजार ९८० बागा महाराष्ट्रातच आहेत. त्यातल्याही ३५ हजार २६० बागा फक्त नाशिक जिल्ह्यात आहेत. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत द्राक्ष निर्यात कंपन्या स्थापन करून त्यात चांगला जम बसवला आहे. त्यांनाही केंद्र सरकारच्या या धोरणाचा फटका बसला आहे.
चौकट
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना अनेक प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी खर्च करावा लागतो. चांगला दर मिळाला तरच यात फायदा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्रोत्साहन रक्कम त्वरित सुरू करावी.
कैलास भोसले, खजिनदार, द्राक्ष बागायतदार संघ
चौकट
निर्यातदार कंपन्यांना प्रोत्साहन रकमेचा फायदा होत होता. ही योजना आता बंद आहे हे खरे आहे, मात्र नवी योजना सुरू करून ही रक्कम पूर्ववत देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
विलास शिंदे, सह्याद्री फार्म, द्राक्ष निर्यातदार कंपनी