पुणे : मासिक पाळीदरम्यान महिलेशी अघोरी कृत्य तसेच तिचा छळ केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २७ वर्षांच्या महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, पती, सासू, सासरे, दीप, भाचा (रा. बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या विरुद्ध अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेचे विश्रांतवाडी येथे माहेर आहे. विवाहानंतर ती बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाइकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. आरोपींनी संगनमत करून महिलेचे हातपाय बांधून अघोरी कृत्य केले. तिच्या दिराच्या सांगण्यावरून त्यांनी हे कृत्य केले. या छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार बीडमध्ये घडला असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून बीड पोलिसांकडे वर्ग केला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भापकर यांनी सांगितले.