लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बदलती जीवनशैली, धावपळ आणि ताणतणाव, उशिरा लग्न होणे, गर्भाशयातील गुंतागुंत अशा अनेक कारणांमुळे महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारींमध्ये गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात एंडोमेट्रिओसिसच्या तक्रारी जवळपास ४० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण स्त्री-रोगतज्ञानी नोंदवले आहे.
यामुळे मासिक पाळीदरम्यान ओटीपोटात असह्य वेदना, तर काही वेळा एंडोमेट्रिअम हे गर्भाशयाच्या आतील आवरण मासिक पाळीतील रक्तस्रावात गळून पडते. हे आवरण गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते, तेव्हा त्याला एंडोमेट्रिऑसिस असे म्हटले जाते. यामुळे भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो. जनजागृतीअभावी बऱ्याच महिलांमध्ये आजाराचे निदान उशिरा होते. १५ ते ४९ या प्रजननक्षम वयोगटामध्ये यो रोगाचे प्रमाण अधिक दिसून येते.
एंडोमेट्रिअम गर्भाशयाच्या बाहेर एंडोमेट्रियल वाढल्यामुळे मासिक पाळीत ओटीपोटामध्ये वेदना होतात. बदलती जीवनशैली, उशिरा लग्न होणे तसेच काही पर्यावरणीय घटक या आजाराला कारणीभूत ठरत आहेत. एंडोमेट्रिओसिसग्रस्त स्त्रियांना बऱ्याचदा वेदनादायक लैंगिक संबंध, मासिक पाळीतील असह्य वेदना, चॉकलेट सिस्ट अर्थात अंडाशयाभोवती आढळणाऱ्या गर्भाशयाच्या अस्तराच्या गाठीची तक्रार सतावते. आजाराचे निदान करण्यासाठी लेप्रोस्कोपी उपयुक्त ठरू शकते,
आयव्हीएफतज्ज्ञ डॉ. करिश्मा डाफळे म्हणाल्या, “पाळी आल्यावर रक्त आणि गर्भपिशवीतल्या आतले आवरण जसे योनीमार्गातून बाहेर येते तसे काही स्त्रियांमध्ये स्राव जास्त असल्यास गर्भनलिकेतून पोटात रक्त पडते. रक्त आणि गर्भाशयाच्या आतील आवरणाच्या पेशी पोटाच्या आतल्या अवयवांवर जाऊन चिकटतात. अशा बीजांडामध्ये रक्ताच्या सिस्ट होतात. वेळीच उपचार न केल्यास किंवा निदान न झाल्यास सिस्ट फुटणे, वंध्यत्व, गर्भाशयाची सूज आणि तीव्र वेदना अशी गुंतागुंत निर्माण करु शकते.”
-----------------
पाळीदरम्यान पोटात तीव्र वेदना, लैंगिक सबंधांदरम्यान वेदना, पाळीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव, मासिकपाळी दरम्यान असह्य थकवा अशी एण्डोमेट्रिऑसिसची लक्षणे आहेत. यापैकी कोणताही त्रास होत आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. शुभांगी पाटील, स्त्रीरोगतज्ञ
---------
काय काळजी घ्यावी?
- एण्डोमेट्रिऑसिसचे निदान झालेल्या स्त्रियांनी वर्षातून एकदा अल्ट्रासाऊंड तपासणी करून घ्यावी. अंडाशयाभोवतीच्या गाठी यामुळे लक्षात येतात.
- मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसांत रक्ताची तपासणी केल्यास अंडाशयाभोवतीचे घटक किती आहे हे समजते.
-गर्भाशयाच्या अस्तराच्या मोठ्या गाठी आढळल्यास त्या स्त्रियांवर शस्त्रक्रियात्मक उपचार सुरू केले पाहिजेत.
- स्त्रियांनी लवकर गर्भधारणेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. लवकर गर्भधारणा नको असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने हार्मोनल उपचार घ्यावेत.