पुणे : नो पार्किंगमध्ये लावलेल्या गाडीला पोलिसांनी लावलेला जॅमरसह गाडी घेऊन जाण्याच्या प्रताप पुण्यात घडला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस गाड्यांची संख्या वाढत असून त्यांच्या वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेने शक्य तिथे पार्किंगची सुविधा, रस्त्यांवर सम व विषम तारखेला समोरासमोर गाड्या लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र तरीही गाडी परवानगी नसलेल्या ठिकाणी लावणाऱ्या नागरिकांना दंड केला जातो. प्रत्यक्ष स्थळी नागरिक उपस्थित नसल्यास काहीवेळा गाडी उचलून नेली जाते तर काहीवेळा गाडीला जॅमर लावला जातो. अशा स्थितीत नागरिकांना जवळच्या पोलीस वाहनतळावर जाऊन दंड भरून गाडी परत आणावी लागते. काही महिन्यांपूर्वी याच पद्धतीने गाडीला लावलेला जॅमर नेणाऱ्या चारचाकी धारकाला पोलिसांनी पाठलाग करून अटक केली होती. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने चोर पकडणे शक्य झाल्याने याही प्रकरणी तसा तपास केला जाण्याची शक्यता आहे.
या पद्धतीने सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास शहरातील मॉडर्न कॉलनीतील चित्तरंजन वाटिकेच्या जवळील थोरात चौकात वाहतूक पोलिसांनी १५०० रुपये किमतीचा जॅमर लावला होता. मात्र संबंधित दुचाकी धारकाने दंड चुकवण्यासाठी जॅमरसह दुचाकी काढून नेल्याचे निदर्शनास लक्षात आले आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.