पिंपरी : जास्त परताव्याचे आमिष दाखवून एका तरुणास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. यात तरुणाची २५ लाख ९७ हजारांची फसवणूक केली. हिंजवडी येथे ८ एप्रिल ते २४ मे या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी २९ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाइल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणाशी संशयिताने सोशल मीडियावरून संपर्क केला.
त्यांना गुंतवणूक केल्यास जास्त परताव्याचे आमिष दाखवले. वेळोवेळी खोटे बोलून त्यांनी फिर्यादी तरुणाचा विश्वास संपादन केला. तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास तरुणाला प्रवृत्त केले. त्यातून फिर्यादी तरुणाकडून २५ लाख ९७ हजार रुपये घेतले. मात्र, नफ्याची रक्कम किंवा फिर्यादी तरुणाने गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत न करता संशयितांनी त्यांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ऋषिकेश घाडगे तपास करीत आहेत.