पुणे : आदिवासी पालकांनी स्वतःच्या मुलांना विकल्याची घटना घडली आहे. पैशाच्या गरजेपोटी नाशिक आणि अहमदनगर भागातील ही घटना धक्कादायक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. याबाबत त्वरित दखल घेऊन अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या जात आहेत का, कोणी समाजकंटक नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत का? याबाबत समिती स्थापन करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
तसेच यावेळी गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील पशुधनाला लम्पी आजाराची लागण झाली आहे. त्याबाबत पशुसंवर्धन विभागाला योग्य औषधोपचार व लसीकरणाबाबत माहिती पुरविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेस उपस्थित राहण्याचे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. संबंधित पत्र खोटे असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे पत्राची सखोल चौकशी व्हावी. संबंधित कार्यक्रम शासकीय नसल्यास सभेला उपस्थित राहणे संयुक्तिक नाही, असे निदर्शनास आल्यास आदेश काढणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश लेखी पत्राद्वारे विभागीय आयुक्तांना दिल्याचे यावेळी सांगितले.
काही दिवसांपूर्वी एका मुलीचे ''लव जिहाद''मुळे अपहरण झाल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात अरेरावी करत गोंधळ घातला होता. घरातल्या त्रासाला कंटाळून घर सोडल्याचे बेपत्ता मुलीने पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सांगितले. पोलिसांच्या कुटुंबीयांनी खासदार राणा यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
शिक्षक भरतीसाठी आंदोलन -
शिक्षक भरती होण्यासाठी सेंट्रल बिल्डिंग येथे शिक्षकांचे आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. मागील पन्नासपेक्षा जास्त दिवसांपासून काळे झेंडे दाखवून आंदोलन सुरू आहे. याबाबत शिक्षक आमदार पुणे ते मुंबई मार्गावर पायी दिंडी काढून शासनाकडे मागण्या करणार आहेत.
भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर बलात्कार
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. संबंधित आरोपीवर योग्य ती कलमे लावून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना दिल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.