मित्राला भेटण्यासाठी मुंबई जात असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला पुणेरेल्वे स्टेशनहून घरी सोडण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकाने अपहरण केलं होतं. त्यानंतर आपल्या मित्राच्या मदतीने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या हरविलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना या मुलीला पोलिसांनी चंडीगढहून ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पुण्यातील शिवाजीनगर, पुणे स्टेशन व खडकी परिसरातील लॉज व इतर ठिकाणी नेऊन पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला. दरम्यान, पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक असून या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
"उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असेही पवार म्हणाले. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
काय आहे प्रकरण?या प्रकरणी वानवडी पोलिसांनी ८ जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. त्यामध्ये रेल्वेचे दोन कर्मचारी, ५ रिक्षा चालक व इतर आरोपींचा सहभाग आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तब्बल दोन दिवस या मुलीवर नराधमांनी अत्याचार केले. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला.
मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर), अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ), रफिक मुर्तजा शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७, रा. कासेवाडी), प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२, रा. ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (वय २९, रा. घोरपडी गाव), नोईब नईम खान (वय २४, रा. बोपोडी), असिफ फिरोज पठाण (वय ३६, रा. लोहीयानगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयाने १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुळची बिहार येथील आहे. तिचे वडील वानवडी येथील एका ठिकाणी माळीकाम करतात. ती तिच्या आई-वडिलांसोबत राहते. ३१ ऑगस्ट रोजी मुलगी तिच्या बिहार येथील मित्राला भेटायला निघाली होती. घरच्यांना याची माहिती न देताच ती पुणे स्टेशन परिसरात आली होती. मात्र तो मित्र आलाच नाही. तसेच रात्री कोणतीही रेल्वे नव्हती. रात्री उशीरापर्यंत ती स्टेशन परिसरात फिरत होती. आरोपींची नजर तिच्यावर पडली. त्यांनी तिला रात्री राहण्याची सोय करतो, उद्या रेल्वेत बसवून देतो, असे सांगितले. त्यामुळे ती या रिक्षाचालकाबरोबर गेली. रिक्षाचालकाने वाटेत आणखी एका रिक्षाचालकाला बरोबर घेतले. तेथून तिला एका लॉजला नेले. तेथे तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर आणखी दोन रिक्षाचालकांनी तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार कोणाला सांगितला तर, आईवडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी अन्य लोकांच्या ताब्यात तिला दिले. दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर मुलगी रेल्वेने मुंबई आणि तेथून चंडीगढकडे गेली होती.