लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डोंगराळ भागात रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे खडकांना भेगा पडलेल्या असतात. अशाच या भेगांमध्ये बर्फ साचतो. त्यावरुन बर्फाचे थरावर थर साचत गेल्याने त्यांच्यावर दाब वाढत जातो. त्यातून असे हिमकडे कोसळतात. असाच प्रकार आज उत्तराखंडमध्ये घडला असण्याची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
ऐनथंडी उणे तापमानात हिमकडा कोसळून उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आला. त्यात शेकडो लोक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. याबाबत ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी लोकमत ला सांगितले की, सध्या वेस्टर्न डिस्ट्ररबन्समुळे जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमालयीन पर्वत रांगा येथे पाऊस, बर्फवृष्टी होत आहे. या भागात हिमालयीन डोंगररांगामध्ये पावसाळ्यात नेहमीच भूस्ख्खलन होत असते. मात्र, हिवाळ्यात असे प्रकार कमी होतात. या भागात रस्ते व इतर कामांसाठी डोंगरांमध्ये सुरुंगाचा वापर केला जातो. त्यामुळे तेथील खडकांमध्ये भेगा पडलेल्या असतात. हिवाळ्यात पाऊस व बर्फवृष्टीमुळे त्यात पाणी, बर्फ साठून राहते व त्या भेगा वाढत जातात. बर्फवृष्टीमुळे त्यांचे थरावर थर साचत जाता. त्यांचे वजन पेलण्याच्या पुढे गेले की, ते मुळ खडकापासून वेगळे होऊन कोसळतात.सध्या जम्मू काश्मीर, उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असे प्राथमिक माहितीवरुन जाणवत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
दुर्घटनेनंतर हवामान विभागाला आली जाग
या दुर्घटनेनंतर हवामान विभागाला जाग आली आहे. त्यांनी उत्तराखंडमधील हवामानाच्या अंदाजाचे खास बुलेटिन काढले आहे. मात्र, ज्या चमोली, जोशीमठ येथे हा प्रकार घडला. त्या ठिकाणच्या हवामान केंद्राची माहिती अनेक दिवसांपासून उपलब्धच नसल्याने हवामान विभागाच्या वेबसाईटवरुन दिसून येते. याशिवाय डेहराडुनमधील काही केंद्रासह अनेक शहरातील कमाल व किमान तापमानाची माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय या भागात पाऊस झाला तरच त्याची नोंद होते. मात्र, बर्फवृष्टी झाली तर ती किती झाली याची नोंद वेबसाईटवर नसते.
९ फेब्रुवारीला १५ मिमीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या बुलेटिननुसार तपोवन, जोशीमठ भागात सोमवारपासून दोन दिवस पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता नाही. चमोली जिल्ह्यात ९ फेब्रुवारीला १५ मिमीपर्यंत हलक्या पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.