देहूगावः किन्हई- बोडकेवाडी येथील बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. आदेश सुरेश हगवणे (वय १७ वर्षे रा. विठ्ठलनगर, देहूगाव) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवार पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे आणि त्यांचे पथक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर तरूणाचा मृतदेह शोधण्यासाठी सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला बोलावण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदेश हगवणे व आणखी चार जण असे पाच जण पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी बोडकेवाडी येथील बंधाऱ्यावर आले होते. सध्या मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी मध्ये मावळातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह या भागात वेगाने वाहत आहे. आदेशला या वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.