पुणे : पीएमपी बसमधील प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी प्रवाशांकडील सोन्याचे दागिने, रोकड, मोबाईल संच असा मुद्देमाल लांबविल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
याबाबत एका महिला प्रवाशाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मुळच्या साताऱ्यातील आहेत. गुरूवारी सकाळी त्या पिंपरीतील फुगेवाडी ते स्वारगेट दरम्यान धावणाऱ्या पीएमपी बसने प्रवास करत होत्या. चोरट्याने बसच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतील सोन्याची माळ, सात हजारांची रोकड, आधारकार्ड, पॅनकार्ड, घराच्या चाव्या असा ३७ हजारांचा मुद्देमाल लांबविला. स्वारगेट स्थानकात उतरल्यानंतर त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. लोहोटे तपास करत आहेत.
दुसरी घटना स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात घडली. एका प्रवाशाच्या खिशातील मोबाइल संच आणि रोकड असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याबाबत प्रवाशाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस नाईक व्ही. ई. खोमणे तपास करत आहेत.