लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ इंग्रज सत्तेत होते तेव्हापासून आजपर्यंत भटका विमुक्त समाज दुर्लक्षित आहे. या समाजाच्या विकासासाठी शासनाकडे पुरेसा निधी नाही. या समाजाला पुढे आणायचे असेल तर त्यांचा समावेश ‘आदिवासी’ म्हणून अनुसूचित जमातीत करून न्याय मिळवून दिला पाहिजे,” असे मत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.
राष्ट्र सेवा दल आयोजित दलदिन मेळाव्यात ते मंगळवारी (दि. २९) बोलत होते. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश देवी, संपत कांबळे, वृंदा हजारे, ज्योती भिलारे, मंगला कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
माने म्हणाले की, पूर्वी चोऱ्यामाऱ्या करणारा हा समाज आज रस्त्यावर फुलं विकून आपली गुजराण करत आहे. मात्र आरक्षणात आणि शिक्षणात भटक्या विमुक्त समाजातील मुलांना एक टक्कासुद्धा लाभ मिळत नाही. पुरेशा सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी असलेल्या सुविधांवर दुसरेच चलाखीने डल्ला मारत आहेत. या समाजाची ताकद कमी असल्याने शासन कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही. संवेदनशील भारतीय नागरिक व सेवादलासारख्या समविचारी संघटनांनी एकत्र येऊन आमच्या या हक्काच्या लढ्याला साथ दिली पाहिजे.
भगवान कोकणे, प्रकाश कदम, दत्ता पाकीरे, रमेश शिंदे, राजेंद्र सासवडे, उमाकांत भावसार, सलीम शेख यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. मगन ताटे यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा ताटे यांनी आभार मानले.