पुणे : परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलेल्या प्रयोगांचा स्मार्ट सिटीच्या प्रस्तावामध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्यानुसार स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीच्या माध्यमातून ते प्रयोग पुणे शहरामध्ये केले जाणार आहेत.स्मार्ट सिटी योजनेसाठी देशभरातून १०० शहरांची निवड करण्यात आली आहे. केंद्राकडून डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील २० शहरांची निवड केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात समावेश व्हावा, म्हणून पुणे शहराकडून जोरदार तयारी केली जात आहे. महाराष्ट्रातून स्मार्ट सिटीसाठी १० शहरांची निवड झाली आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्यात एकाच शहराचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्या स्पर्धेत पुणे अग्रेसर आहे.महापालिकेने केंद्राकडे सादर करावयाच्या प्रस्तावासाठी मॅकेन्झी कंपनीची निवड केली आहे, प्रस्ताव सादर करण्यासाठी १०० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पहिल्या २० शहरांमध्ये निवड होण्यासाठी जोरदार स्पर्धा असल्याने पुणे महापालिकेकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रस्तावाची छाननी करून त्याचे मूल्यांकन करण्याचे तसेच पहिल्या २० शहरांची निवड करण्याचे काम एका समितीकडून केले जाणार आहे. या समितीमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या योजनांचा प्रभाव पडेल यादृष्टीने प्रस्तावाची तयारी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.परदेशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पेपरलेस कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या, दाखले आॅनलाइन पद्धतीने देता येतील का, याची जुळवाजुळव केली जात आहे. राज्याकडे प्रस्ताव सादर करताना आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांकरिता ‘स्मार्ट पुणं, माझं पुणं’ ही अभिनव स्पर्धा घेतली. त्यातून अनेक चांगल्या कल्पना पालिकेला मिळाल्या आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारचे अॅप तयार करण्याच्या सूचना आल्या आहेत. त्यावरही विचार केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय प्रयोगांचा प्रस्तावात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2015 4:35 AM