पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने पहिल्या दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटी रूपये जमा केले आहेत. त्यातील बहुतांशी भरणा हा आॅनलाईन पद्धतीने झाला आहे. आता दोन महिन्यांनंतर कर जमा करण्यासाठी म्हणून जाहीर केलेल्या सर्व सवलती बंद झाल्या असल्याचे या विभागाने कळवले आहे. ८ लाख ७५ हजार मालमत्ताधारकांपैकी पहिल्या दोन महिन्यातच तब्बल ५ लाख ३४ हजार ४३४ जणांनी कर जमा केला आहे. गेल्या काही वर्षात या विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत. त्यामुळे त्यांना वारंवार मेसेज पाठवून निरोप देणे त्यांना शक्य होते. त्यातूनच कर वेळेवर जमा करणाºयांच्या संख्येत वाढ होत आहे. घरबसल्या कर जमा करता यावा यासाठी विशेष संकेतस्थळही या विभागाने सुरू केले आहे. त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी एकूण रकमेपैकी ३५ टक्के रकमेचा भरणा आॅनलाईन पद्धतीने झाला होता. यावर्षी आता पहिल्या दोन महिन्यातच २ लाख ६१ हजार १६५ जणांनी आॅनलाईन पद्धतीने एकूण २५० कोटी ७१ लाख रूपये जमा केले आहेत.यापद्धतीने वेळ वाचतो, शिवाय आॅनलाईन पद्धतीने कर जमा करणाऱ्या करपात्र रकमेवर २ टक्के सवलत मिळते. मात्र, ती रोख स्वरूपात न देता पुढील वर्षीच्या बिलामध्ये दिली जाते. त्यामुळे त्याला वाढता प्रतिसाद मिळतो आहे. त्यातुलनेत प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन रोखीने कर जमा करण्याचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. पहिल्या दोन महिन्यांमध्ये एकूण १ लाख ४४ हजार ८८५ जणांनी फक्त ८५ कोटी रूपये जमा केले आहे. धनादेशाने कर जमा करणाऱ्यांची संख्याही फार नाही. १ लाख २८ हजार ४०० जणांनी ३१५ कोटी रूपये जमा केले आहेत. आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांचे प्रमाण आता ३८. ४२ टक्के झाले असून त्या तुलनेत रोख कर जमा करणारे फक्त २७ टक्के आहेत. धनादेशाने भरणा करणाऱ्यांचे प्रमाण २४ टक्के आहे. कॅशलेस इकॉनॉमीत महापालिकेने या विभागाने बरीच मोठी आघाडी घेतली असल्याचे दिसते आहे.
दोनच महिन्यात तब्बल ६५० कोटींचा मिळकत कर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 9:01 PM
गेल्या काही वर्षात मिळकत कर विभागाने संगणक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एकूण मालमत्ताधारकांपैकी तब्बल ६ लाख जणांचे मोबाईल क्रमांक, ई मेल या विभागाकडे आहेत.
ठळक मुद्देआॅनलाईनमध्ये वाढ : सर्व सवलती १ जूनपासून बंदपहिल्या दोन महिन्यातच तब्बल ५ लाख ३४ हजार ४३४ जणांनी कर जमा केला